शहाजीबापूंच्या पुतण्याच्या गाडीवरील हल्ल्याचा निषेध ; तीन गावांमध्ये बंद 

युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवरील भ्याड हल्ल्यातील आरोपीचा येत्या दोन दिवसांत पोलिसांनी छडा लावावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने सांगोला तालुका बंद करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांनी दिला आहे. दरम्यान, पोलिसांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या निवासस्थानासमोर व शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. सागर पाटील यांच्या गाडीवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मांजरी, कडलास, बलवडी आदी गावात शिवसेनेच्या वतीने बंद पाळण्यात आला.

हल्लेखोरांचा त्वरित शोध लावून त्याच्या पाठीमागील कटकारस्थान करणाऱ्या मास्टरमाईंडचाही शोध घ्यावा तसेच सागर पाटील यांना पोलिस संरक्षण देऊन या प्रकरणाची चौकशी त्वरित करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आनंद माने, शहर प्रमुख माऊली तेली, समीर पाटील, अच्युत फुले, युवा सेना तालुकाप्रमुख गुंडा खटकाळे, सोमेश यावलकर, प्रा. संजय देशमुख, अभिजीत नलवडे, सुभाष इंगोले, संभाजी ब्रिगेडचे अरविंद केदार, हरिभाऊ पाटील, बाळासाहेब आसबे, अजिंक्य शिंदे, सुनील पवार, श्रीनिवास करे, राहुल गायकवाड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.