शहरात यंदाही धुळवडीच्या सणाला गालबोट लागले. एसटी, चारचाकी वाहने, टेम्पोच्या काचा फोडत दुकानांचे नुकसान केले गेले. सलग तिसऱ्या वर्षी शहरात अतिउत्साही तरुण, मुलांनी धुळवड सणाचा बेरंग केला. एसटी वाहतुकीला सर्वाधिक असुरक्षित प्रवास करावा लागला असून अनेक प्रवाशांना इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी गावभाग व शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुमारे सहा गुन्हे आज दाखल झाले आहेत. गल्लोगल्ली, प्रमुख मार्गांवर पहाटेपासून धुळवडीदिवशी वाहनधारकांकडून पैसे गोळा केले जातात.
यातून होणारा हुल्लडपणा रोखण्यासाठी शहरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. तरीदेखील सणाचा बेरंग झाल्याचे पाहायला मिळाले. मुले, तरुण वाहनधारकांना अडवून जबरदस्तीने पैशाची मागणी करत होते. तर होळीची राख फेकून अक्षरक्षः दहशत निर्माण केली जात होती. सर्रास एसटी गाड्यांवर राखेचे गोळे फेकले जात होते. ही राख खिडकीतून आत जात प्रवाशांच्या डोळ्यात जाऊन इजा झाली. तर चालक, वाहकाला एसटी चालवताना प्रचंड कसरत करावी लागली. अशा अवस्थेतही एसटी सेवा सुरू राहिली, मात्र ती असुरक्षितपणेच. राखेने न माखलेली एसटी गाडीच सापडू नये, इतके विदारक चित्र इचलकरंजी बसस्थानकात पाहायला मिळाले.