वस्त्रनगरीत धुळवडीचा जल्लोष!

सलग सुट्टीत धुलिवंदन आल्याने आज सकाळपासूनच शहरात कमालीचे उत्साहाचे वातावरण होते.
रंगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी सकाळपासूनच धुळवडीला सुरुवात झाली होती. गल्ली, वस्त्यांमध्ये सामुहिक धुलिवंदनाचा आनंद घेतला गेला. काही ठिकाणी समूहाने एकत्रित येत एकमेकांवर रंग उधळले. पाणीटंचाईच्या स्थितीमुळे सध्या दोन ते तीन दिवसाआड करावा लागणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा वापर टाळण्यावर भर दिल्याचे पाहायला मिळाले.

तरुणाई सप्तरंगाची उधळण करत विविध गाणी, ढोल-ताशाच्या ठेक्यावर नाचत रंगांत अक्षरशः न्हाऊन निघाले. शहरात विविध ठिकाणी तरुणाईसह बच्चे कंपनी, वयोवृध्द नागरिकांनी एकत्रित येऊन जल्लोष केला. यात मारवाडी, उत्तर भारतीयांनी सहकुटुंब धमाल केली. यानिमित्ताने धुलिवंदनाचा सण शहरात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
रविवारी रात्री (ता. २३) होळीचा सण उत्साहात साजरा झाला.

या पार्श्‍वभूमीवर दुसऱ्या दिवशी शहरात धुलिवंदनाचे रंग खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मारवाडी समाज, उत्तर भारतीय नागरिक सकाळपासून रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. कापड मार्केट, धान्य ओळ, बोहरा मार्केट, तीन बत्ती चौक, कागवाडे मळा, करोडपती कॉलनी, यशोलक्ष्मी नगर, आदी ठिकाणच्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये एकमेकांवर रंग उधळत धुळवड खेळली जात होती. काही ठिकाणी गाण्याच्या तालावर छोट्या कंपनीसोबत मोठ्यांनीही ताल धरला.