इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिली ते आठवीच्या ३४ प्राथमिक शाळा आणि १ हायस्कूल आहे. चालू शैक्षणिक वर्षासाठी या शाळांना मोफत गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीमार्फत खरेदी करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा अभियान अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेत शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली आणि अनुसूचित जाती-जमाती, दारिद्र्य रेषेखालील मुलांना मोफत गणवेश दिला जातो.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य आणि गणवेश दिला जाते. गतवर्षी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण-क्रीडा विभागामार्फत राज्यातील शाळांना गणवेश पुरवण्यासाठी एकाच मक्तेदाराला वर्कऑर्डर दिली होती. त्या मक्तेदाराने निकृष्ट दर्जाच्या कपड्यांची ओबडधोबड शिलाई करुन गणवेश दिला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचेही शासनाच्या निर्देशनास आले होते. त्याबाबत पालकांनीही तक्रारी करून नाराजी व्यक्त केली होती.
शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांसाठी शालेय व्यवस्थापन समितीमार्फत गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदीचा आदेश दिला आहे. त्यानुसार चालु शैक्षणिक वर्षात महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थाना शाळा सुरु होण्यापूर्वी दर्जेदार गणवेश आणि गुणवत्तापुर्वक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी शालेय व्यवस्थापन समितीकडे निधी वर्ग करून शाळा व्यवस्थापन समितीकडून गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याची मागणी मोरबाळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.