राज्यात घटस्थापनेला विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार?

मान्सूनने महाराष्ट्रातून जवळपास माघार घेतली आहे. मागील अनेक दिवसांपासून पावसाने सुट्टी घेतली आहे. आता ऑक्टोबर हीटच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. मात्र घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण, उत्तर महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसू शकतो. कारण अनेक पिके आता काढणीला आली आहेत. या पावसामुळे पिकांचं नुकसान होऊ शकतं.

कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाच्या सरी बरसू शकतात. तर उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

ऑक्टोबरचे हीटचे चटके

मान्सूनच्या एक्झिटनंतर हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यात अनेक भागात कडाक्याचं ऊन आहे. ऑक्टोबर हीटचे चटके नागरिकांना जाणवत आहेत. शनिवारी राज्यात अकोला आणि ब्रह्मपूरी येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मुंबईत धुक्याची चादर

रविवारी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातही धुक्याची चादर पाहायला मिळाली. सकाळी वातावरणात गारवा जाणवत होता. त्यामुळे दिवसभर कडक ऊन आणि सकाळी गारवा असं मिश्र वातावरण सध्या मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आहे.