कोल्हापूरच्या राष्ट्रवादीच्या परिस्थितीला जबाबदार कोण?

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर हा पक्ष कायम सत्तेच्या शिखरावर राहिला. आता त्याच जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची दुर्दशा झाली आहे.

येथील पक्षाच्या नेत्यांनी मी आणि माझे कुटुंब, पै-पाहुणे एवढ्यापुरताच ठेवला. जवळील कार्यकर्त्यांशिवाय पक्षासाठी राबणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. तसेच मी आणि माझा मतदारसंघ एवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेल्या नेत्यांमुळे जिल्ह्यात पक्षाची वाढ खुंटली. परिणामी कोल्हापुरात आज 25 वर्षांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती म्हणजे ‘बडा घर, पोकळ वासा’ अशी झाल्याचे दिसून येत आहे.एकेकाळी बारापैकी सात आमदार आणि दोन खासदार देणारा जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचा (NCP) पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता; पण त्या तुलनेत नवी पिढी घडवण्याकडे नेतृत्वानेच दुर्लक्ष केले.

विधानसभा सोडून कोणतीही निवडणूक असो त्यात आपला घरचा, जवळचा याशिवाय विचार झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सध्या पक्ष संघटन वाढण्याऐवजी कमी होताना दिसत आहे. त्यातच काही महिन्यांपूर्वी पक्षात पडलेल्या फुटीमुळे तर अवस्था आणखी दयनीय झाली आहे. आता दोन्ही गटांना आपापला पक्ष वाढण्यासाठी, टिकवण्यासाठी जिवाचे रान करावे लागणार आहे. त्यांच्यासमोर नवीन चिन्ह घराघरामध्ये पोहोचविण्याचे आव्हान आहे.