राजस्थान रॉयल्स , दिल्लीला पराभूत करत स्थान टिकवलं

आयपीएल 2024 स्पर्धेत प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेवर फरक दिसून येत आहे. स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याचे सामने सुरु आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. होम ग्राउंडचा ट्रेंड येथेही लागू पडला. राजस्थानच्या होम ग्राउंडवर झालेल्या सामन्यात दिल्लीला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला होता. दिल्लीने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने राजस्थानला बऱ्यापैकी जाळ्यात अडकवलं होतं. पण रियान परागने या सर्वावर पाणी फेरलं. रियानने नाबाद 84 धावांची खेळी केली. तसेच शेवटच्या षटकात ठोकलेल्या 25 धावा दिल्लीच्या पराभवास कारणीभूत ठरल्या. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 5 गडी गमवून 185 धावा केल्या आणि विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं. दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकात 5 गडी गमवून 173 धावा करता आल्या. दिल्लीला 12 धावांनी पराभव सहन करावा लागला.

चेन्नई सुपर किंग्स दोन पैकी दोन सामने जिंकत 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. नेट रनरेट हा 1.979 इतका आहे. तर राजस्थान रॉयल्सने सलग दुसरा सामना जिंकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 4 गुण आणि 0.800 च्या रनरेटसह दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. सनरायझर्स हैदराबाद 2 गुण आणि 0.675 नेट रनरेटसह तिसऱ्या, कोलकाता नाईट रायडर्स 2 गुण आली 0.200 नेट रनरेटसह चौथ्या, पंजाब किंग्स 2 गुण आणी 0.025 नेट रनरेटसह पाचव्या, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 2 गुण आणि -0.180 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी, तर गुजरात टायटन्स 2 गुण आणि -1.425 नेट रनरेटसह सातव्या स्थानी आहे.