चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा हा त्याच्या मैदानातील कामगिरीबरोबरच मस्तीखोरपणासाठी आणि खोचक प्रतिक्रियांसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जडेजाने आपल्या अशाच मजेदार कमेंटची झलक दाखवली आणि सगळेच उपस्थित हसू लागले. विशेष म्हणजे ही प्रतिक्रिया जडेजाच्या निकटवर्तीय खेळाडूंपैकी एक असलेल्या महेंद्रसिंह धोनीबद्दल आहे. चेन्नईच्या माजी कर्णधाराच्या पत्नीचा म्हणजेच साक्षी धोनीचा उल्लेख करत जडेजाने ही प्रतिक्रिया नोंदवली.2023 सालच्या इंडियन प्रिमिअर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये जडेजाने चिवट फलंदाजी करत संघाला पाचव्यांदा जेतेपद मिळवून दिलं.
जडेजाच्या खेळीमुळे विजय मिळवल्यानंतर भावूक झालेल्या धोनीने डगआऊटजवळ जडेजाला उचलून घेतलं होतं. धोनीने जडेजाला उचलून घेतल्याचा हा क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या क्षणाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केले होते. गुजरात टायटन्सविरुद्धच्या आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यानंतरच्या याच क्षणाचा संदर्भ देत जडेजाने धोनीच्या पत्नीचा उल्लेख केला.
एका मुलाखतीमध्ये चेन्नईच्या संघ सहकाऱ्यांबरोबर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करताना जडेजाने एक मजेदार वक्तव्य केलं. “मला वाटतं साक्षी वहिनीनंतर मीच एकमेव व्यक्ती असेल जिला धोनी भाईने उचलून घेतलं असेल,” असं जडेजा म्हणाला. जडेजाचं हे विधान ऐकून धोनीसहीत सारेचजण हसू लागले.