केरळमधून एक हादरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कोझिकोड जिल्ह्यात केवळ 9 वर्षीय मुलीचा अमीबिक इंसेफेलायटिस या दुर्मिळ आणि जीवघेण्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. अमिबा नाकातून शरीरात शिरला आणि थेट मेंदूवर (Brain) आघात करत झपाट्याने संक्रमण पसरलं. परिणामी उपचारादरम्यानच चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती समोर आली आहे.
तापाच्या साध्या लक्षणांनी सुरुवात झालेला हा आजार इतका भीषण ठरला की केवळ एका दिवसात तिची प्रकृती ढासळली. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हा आजार दूषित गोड्या पाण्यात आढळणाऱ्या नेगलेरिया फाउलेरी अमिबामुळे होतो. अमिबा नाकावाटे शरीरात शिरून थेट मेंदूवर हल्ला करतो आणि मेंदूच्या पेशी नष्ट करत जातो, असं आरोग्य विभागाने सांगितलं.
डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “संक्रमण झपाट्याने पसरतं त्यामुळे वेळेत उपचार करणं अवघडं होतं असल्यानेच मृत्यूचं प्रमाण अधिक आहे.” कोझिकोडमध्ये एका वर्षात या आजारामुळे चौथा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण आहे. आरोग्य विभागाने तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांची तपासणी सुरू केली आहे. तसेच, नागरिकांना दूषित पाण्यात अंघोळ टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
“दुर्मिळ असला तरी हा आजार जीवघेणा आहे. त्यामुळेच नागरिकांनी खबरदारी घेणं आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं हीच काळाची गरज आहे,” असं डॉक्टर अविनाश भोंडवे म्हणालेत.
अमीबिक इंसेफेलायटिस, ज्याला प्रायमरी अमीबिक मेनिन्जोएन्सेफलायटिस (PAM) असेही म्हणतात, हा एक अत्यंत दुर्मिळ आणि प्राणघातक मेंदूचा संसर्ग आहे. हा आजार नेगलेरिया फाउलेरी नावाच्या मुक्त-जिवंत अमीबामुळे होतो, जो दूषित गोड्या पाण्यात (उदा., तलाव, नद्या, विहिरी) आढळतो. हा अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करून मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूच्या पेशी नष्ट करतो.
