फुटबॉलचा महानायक आणि क्रिकेटचा देव लवकरच एकाच मैदानात बघायला मिळणार

फुटबॉलचा (Football) महानायक लिओनेल मेस्सी लवकरच भारतात दाखल होणार आहे. त्याचा हा बहुप्रतिक्षित दौरा १२ डिसेंबरपासून सुरू होईल. या दौऱ्यात तो कोलकाता, अहमदाबाद, मुंबई आणि दिल्ली अशा मोठ्या शहरांना भेट देणार आहे. मेस्सीच्या या भेटीत अनेक विशेष कार्यक्रमांचा समावेश आहे. कोलकात्यात त्याच्यासोबत सौरव गांगुली, लिअँडर पेस, बाईचुंग भुटिया आणि जॉन अब्राहम यांसारखे दिग्गज एका मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात सहभागी होणार आहेत.

कोलकात्यातील मुक्कामात त्याला २५ फूट उंच पुतळा आणि विशाल भित्तिचित्रही भेट दिले जाणार आहे. यानंतर तो अहमदाबादमध्ये अदानी फाउंडेशनच्या कार्यक्रमात हजेरी लावेल. १४ डिसेंबरला मेस्सी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर “GOAT Cup” खेळताना दिसणार आहे. या विशेष सामन्यात क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्यासोबत मैदानात उतरणार आहे. दिल्लीच्या कार्यक्रमात विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा आहे. दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी, म्हणजे १५ डिसेंबरला मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. हा मेस्सीचा भारतातील दुसरा दौरा आहे. यापूर्वी २०११ साली त्याने अर्जेंटिनाकडून कोलकात्यात व्हेनेझुएलाविरुद्धचा सामना खेळला होता. या वेळेस मात्र मेस्सी फक्त सामनेच खेळणार नाही, तर प्रत्येक शहरात नवोदित फुटबॉलपटूंना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधणार आहे.