साखरसम्राटांनी मागील हंगामातील ऊस फरक दिला नाही, तर मैदानात घेऊन लोळवल्याशिवाय राहणार नाही. मी लोकशाही मानणारा माणूस आहे. २०१९ च्या निवडणुकीचा जनमताचा कौल मान्य करून त्याचा आदर करून काही चुका झाल्या, त्याचे आत्मपरीक्षण करू. पुन्हा नव्या दमाने तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केले. बागणी येथे लोकसभा निवडणुकीदरम्यान आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, भागवत जाधव, संजय बेले, एस. यू. संदे, शिवाजीराव पाटील, उत्तम पाटील, साहेबराव पाटील प्रमुख उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, गत वर्षी संघटनेने केलेल्या ऊस आंदोलनामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. सत्ताधारी सरकारने साखर निर्यातीवर बंदी घातली.
यावर ग्रामीण भागातील खासदाराने आवाज उठवला नाही आणि जाबही विचारला नाही. निर्णयात बंदी उठली असती, तर याहून अधिक दर आपल्या उसाला मिळाला असता. प्रत्येक कारखान्याने जिल्हाधिकाऱ्यांना मागील वर्षाच्या बिलातील फरक देण्याचे हमीपत्र दिलं आहे. निवडणुकीनंतरही जून, जुलैमध्ये ऊस फरक न देणाऱ्या कारखान्यांतील साखरेचा एक कणही बाहेर पडू देणार नाही. आगामी वर्षात त्या कारखान्याची धुराडीही पेटू देणार नाही. संघटनेचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी जिल्ह्यातील साखरसम्राट ऊस तोडणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना झिंगवण्याचे काम करीत आहेत.
विकासाच्या नावाखाली खासगी कंपन्यांना शक्तिपीठ महामार्गाचे कामे द्यायची आणि टोलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची लूट करायची, छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं शोषण मुक्त समाज निर्माण केला होता. जगन्नाथ भोसले, आप्पासाहेब बेडके, भास्कर शेटे, सुरेश पाटील, सिद्धिविनायक बामणे उपस्थित होते.