कोल्हापूर शहर परिसरात वळवाचा शिडकाव!

कोल्हापूर शहर आणि लगतच्या उपनगरात काल संध्याकाळी वळीव पाऊस पडला. त्यामुळे तप्त वातावरणात काहीसा गारवा आला. मात्र पाऊस तुरळक असल्याने रात्री पुन्हा उकाडा वाढला. दरम्यान, जिल्ह्यात काही ठिकाणी मात्र वादळी पाऊस झाल्याने नुकसान झाले. काल दुपारपासूनच आभाळ दाटले होते. वाराही वेगाने वाहत होता. त्यामुळे वळवाचा पाऊस पडणार असा अंदाज होता. संध्याकाळी चार वाजता शहर आणि आसपासच्या उपनगरात वळवाचा तुरळक पाऊस पडला.

राशिवडे बुद्रुक येथे सायंकाळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एका बेकरी उत्पादित कंपनीच्या छताचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. वादळानंतर लगेचच पाऊस सुरू झाल्याने या बेकरीचे सुमारे १५ लाखांचे मशीन आणि तयारसह कच्चा माल भिजला .येथील पेट्रोल पंपाच्या बाजूलाच असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये स्वप्नील चांदणे यांनी वर्षभरापूर्वी बेकरी उत्पादित कारखाना सुरू केला आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे पत्रे उचकटले आणि थेट काही पत्रे रस्त्याच्या पलीकडे तर काही आत तेलाच्या काहिलीजवळ पडले.