‘सकाळ’च्या दिवाळी अंकामुळे चित्र साक्षरता वाढेल

चित्रपट नाटक, संगीत, साहित्यावर विविधांगी चर्चा होते; पण चित्रकलेबाबत फारशी चर्चा होत नाही. ‘सकाळ’च्या यंदाच्या दिवाळी अंकामुळे मात्र या विषयावर सर्वांगीण मंथन झाले आहे. या माध्यमातून समाजातील चित्र साक्षरता नक्कीच वाढेल, असा विश्वास आज चित्रकारांनी व्यक्त केला. निमित्त होते, ‘सकाळ- कोल्हापूर’ च्या ‘चित्रोत्सव’ दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या खरी कॉर्नर येथील स्टुडिओत हा सोहळा सजला.

दरम्यान, ज्येष्ठ चित्रकार विजयमाला मेस्त्री-पेंटर यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन झाले. ‘सकाळ’चा हा चित्रकलेसाठी वाहिलेला दिवाळी अंक नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा देईल, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. प्राचार्य अजेय दळवी म्हणाले, “दिवाळी अंकांच्या विश्वात ‘सकाळ’ने नेहमीच वेगळेपण जपले आहे. मुळात चित्रकलेसारख्या विषयावर दिवाळी अंकाची संकल्पनाच कौतुकास्पद आहे. केवळ कला क्षेत्रच नव्हे, तर सर्वच घटकांसाठी हा अंक मार्गदर्शक ठरणार आहे.’ प्रसिद्ध जाहिरातकार अनंत खासबारदार म्हणाले, ‘चित्रकारांच्या कलाकृती हीच त्यांची खरी ओळख असते.

मात्र, या अंकामुळे चित्रकारही लिहिते झाले. सध्याच्या दिवाळी अंकांच्या झगमगत्या जगात हा प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे. ‘सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘मराठीतील दिवाळी अंकांची परंपरा मोठी आहे. गेली काही वर्षे कोल्हापूर-सकाळ’चा दिवाळी अंक एका विशिष्ट विषयावर प्रकाशित केला जातो. ही संकल्पना वाचकप्रिय झाली असून, यंदाच्या अंकात चित्रकलेवर सर्वकष अभ्यास असणारे तज्ज्ञांचे माहितीपूर्ण लेख आहेत. चित्रकलेतील विविध प्रवाहांबरोबर चित्र कसे पाहावे,याबाबतचे मंथनही त्यातून झाले आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या स्टुडिओत या अंकाचे प्रकाशन झाल्याचा विशेष आनंद आहे.’

दरम्यान, प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार, व्यंगचित्रकार धैर्यशील माने यांनीही मनोगते व्यक्त केली. चित्रकार तानाजी अवघडे, विजय टिपुगडे, प्रशांत जाधव, अक्षय जाधव आदी यावेळी उपस्थित होते… चित्रकला, त्यातील ओल्ड मास्टर्स, त्यांच्या विविध कलाकृती समकालीन चित्रकारांच्या कलाकृती, विविध माध्यमांतील बदलते प्रवाह, त्यातील करिअरपासून ते आत्मिक समाधानापर्यंत अशा विविध अंगांनी चित्रकलेतील तज्ज्ञांनी या अंकात लेखन केले आहे. एकूणच आजवरच्या ‘लोकल टू ग्लोबल’ चित्रकलेचा हा एक संदर्भग्रंथच आहे. अंक सर्वत्र उपलब्ध झाला आहे.