हातकणंगलेतील सूत गिरणीच्या गोदामाला भीषण आग!दहा कोटीचे नुकसान

सध्या गुन्हेगारी च्या प्रकारात तर वाढ होतच आहे अशातच अलीकडच्या काळात आग लागण्याच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. हातकणंगले येथील श्री. लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील अरविंद स्पिनिंग मिलला काल रात्री साडे बाराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये चार महिन्यांचा कापसाचा साठा जळून खाक झाला. सुमारे ४२०० कापसाच्या गाठी असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने ती अधिक फैलावत गेली.

या दुर्घटनेत कंपनीचे सुमारे नऊ कोटी साठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. याबाबतची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यांत झाली आहे. हातकणंगले मधील श्री. लक्ष्मी औद्योगिक वसाहती मधील अरविंद स्पिनिंग मिलमध्ये कापसांपासून यार्नचे उत्पादन केले जाते.

या कंपनीमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालत असून जवळपास दोनशेहून अधिक महिला व पुरुष कर्मचारी या ठिकाणी काम करतात. या मिलला काल रात्री साडेबाराच्या दरम्यान अचानक आग लागली. गोडावूनमध्ये कापसाच्यागाठी असल्याने आग वाढतच गेली. याबाबतची माहिती पोलिसांनाही कळवण्यात आली. तर अग्निशामन दलालाही पाचारण करण्यात आले.