ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती विरोधकांचा प्रचार सुरू आहे, ते पाहून येणाऱ्या काळात माझ्यावरती वैयक्तिक आणि माझ्या कुटुंबावरती चुकीचे आरोप केले जातील.चुकीची माहिती पसरवून चारित्र्यहणन करण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दहा वर्षांत नेमके काय काम केले, याचा लेखाजोखा मांडा आणि त्यावरती निवडणूक लढवा.
सोशल मीडियावर ते म्हणतात की, आता रामराज्य येणार आहे, मग मागील दहा वर्ष रावण राज्य होते का, अशी विचारणा करत काँग्रेस नेत्या आणि सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रणिती शिंदे विविध भागात बैठका, सभा, मेळावे घेताना दिसत आहेत. या प्रचारादरम्यान प्रणिती शिंदे भाजपावर घणाघाती टीका करताना पाहायला मिळत आहेत. अक्कलकोट येथे घेण्यात आलेल्या एका प्रचारसभेत प्रणिती शिंदे यांनी भाजपसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.