इंग्लंडने (England) भारताविरोधात मॅनचेस्टर येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग 11 ची घोषणा केली आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने संघात एकमेव बदल केला आहे. लियाम डॉसनला जखमी शोएब बशीरच्या जागी संघात स्थान देण्यात आलं आहे. लॉर्ड्स कसोटीदरम्यान बशीरच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. त्याच्या जागी अनुभवी अष्टपैलू खेळाडू लियाम डॉसनला संघात घेण्यात आलं आहे. 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधातील कसोटी सामन्यात तो शेवटचा खेळला होता. विशेष म्हणजे 2016 मध्ये चेन्नईत भारताविरोधात खेळत त्याने कसोटी संघात पदार्पण केलं होतं.
डॉसनने आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत आणि 84 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 66 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे की, ‘भारताविरुद्ध एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या पुरुष संघात एक बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त शोएब बशीरच्या जागी हॅम्पशायरचा फिरकी गोलंदाज लियाम डॉसनचा समावेश करण्यात आला आहे. जुलै 2017 नंतर डॉसनचा हा पहिलाच कसोटी सामना असेल.’
लियाम डॉसन गेल्या काही वर्षात जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळला आहे. त्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने 212 सामन्यात 10 हजार 731 धावा केल्या असून, 371 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकने डॉसनच्या पुनरागमनावर म्हटलं आहे की, “तो फार हुशार आणि अनुभवी खेळाडू आहे. तो प्रत्येक जागी आणि प्रत्येक संघाविरोधात खेळला आहे. तो चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे.” डॉसनला संघात स्थान मिळाल्याने इंग्लंडच्या फलंदाजीला बळ मिळालं आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड सध्या 2-1 ने आघाडीवर आहे.
