हेडफोनचा नाद जीवावर बेतला; अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरील हृदयद्रावक घटना !

हल्ली स्मार्टफोनबरोबरच हेडफोनचा वापरदेखील वाढला आहे. अनेकदा युवा पिढी काम करताना, प्रवासातदेखील हेडफोन घालून असतात. मात्र कानात हेडफोन घालून प्रवास करणे एका तरुणीच्या जीवावर बेतले आहे. कानात हेडफोन घालून रूळ ओलांडणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, महिलेला वाचवायला गेलेल्या तरुणानेही जीव गमावला आहे. अंबरनाथच्या मोरीवली गावाजवळ ही घटना घडली आहे.

अंबरनाथच्या (Ambernath) मोरीवली गावात राहणाऱ्या 45 वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी नगरमध्ये राहणारा 29 वर्षीय आतिष रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते. रविवारी 20 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी आतिष हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबीन रोडवरील मोरीवली गावाजवळ गेला.

तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे रूळ ओलांडत असतानाच रेल्वे आली, यावेळी आतिष आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला, पण त्यांचं लक्ष नव्हतं. तेव्हा आतिष हा वैशाली यांना वाचवायला गेला, अन तिथेच घात झाला. या दोघांनाही रेल्वेनं उडवलं, यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आतिष याच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्नं झालेली असून तो त्याच्या वृद्ध आईवडिलांचा एकमेव आधार होता. त्याच्या अशा अकाली मृत्यूनं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मोरीवली गाव ते बी केबीन रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ लागली आहे. मोरीवली गावचे माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.