इस्लामपूर – शिराळा विधानसभा मतदारसंघ……


इस्लामपूर – शिराळा विधानसभा मतदारसंघ १९७१ ते २००४ पर्यंत कऱ्हाड लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होता. त्यानंतर २००९ पासून दोन्ही विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समाविष्ट झाले. प्रत्येक निवडणुकीत लोकसभेचे प्रतिनिधित्व सातारा जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्याला मिळत गेल्याने गेली अनेक वर्षे इस्लामपूर – शिराळा विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीत वंचित राहिला आहे. कऱ्हाड लोकसभा मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील वाळवा – शिराळा तालुक्याचा समावेश होता. वाळवा – शिराळा तालुक्यांना येथे प्रतिनिधित्व मिळाले नाही. यानंतर २००९ पासून इस्लामपूर- शिराळा विधानसभा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघास जोडला गेला. २००९ च्या निवडणुकीला स्वाभिमानीचे राजू शेट्टी निवडून आले.

सातारा, कोल्हापूर जिल्ह्याला झुकते माप गेल्या १३ लोकसभा निवडणुकांमध्ये सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्यात इस्लामपूर- शिराळ्याचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत या दोन तालुक्यांना प्रतिनिधित्वच मिळाले नाही. त्यानंतर २०१४ ला पुन्हा शेट्टीच संसद सदस्य झाले. २०१९ मध्ये शेट्टी यांचा पराभव झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील धैर्यशील माने यांना लोकसभेत पाठवण्यासाठी इस्लामपूर – शिराळा विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे योगदान मोठे आहे. एकंदरीत १३ लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघातून एकही उमेदवार निवडून गेलेला नाही.
२०२४ च्या निवडणुकीतही राजू शेट्टी आणि धैर्यशील माने उमेदवार आहेत.

प्रतीक पाटील आणि राहुल महाडिक इस्लामपूर – शिराळा विधानसभा मतदारसंघातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार होऊ शकले असते. मात्र, तीही संधी आता हुकली आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत इस्लामपूर- शिराळा मतदारसंघ नेहमीच पोरका राहिला आहे. इस्लामपूर लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही नेत्याला आजपर्यंत संसदेसाठी संधी मिळाली नाही.