वाळव्यातील रोडरोमिओंवर निर्भया पथकाची करडी नजर

वाळवा तालुक्यातील शाळा, कॉलेज, सार्वजनिक उद्याने, धार्मिक स्थळे आणि गर्दीची ठिकाणे अशा तब्बल १४० ठिकाणी निर्भया पथक करडी नजर ठेवून आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने अल्पावधीतच ठोस कारवाई करत रोडरोमिओंना चांगलाच धडा शिकविला आहे. 

आतापर्यंत पथकाने बीपी अॅक्टनुसार तब्बल ७०४ केसेस दाखल केल्या आहेत. त्यापैकी २४ खटले न्यायालयात दाखल झाले असून १२ हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार ६३ केसेस दाखल करून ६३,२५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. रामलिंग बेट बहे, दत्त टेकडी, मल्लिकार्जुन डोंगरी, अंबिका उद्यान, कुसुमगंध उद्यान, राममंदिर साखराळे, शिवपुरी डोंगर, रेठरे धरण तलाव, तुकाई टेकडी, तसेच इस्लामपूर व वाळवा तालुक्यातील विविध कॉफी शॉप्सवर निर्भया पथकाची टेहळणी ठेवत आहे. या कामगिरीत उपविभाग पोलिस अधिकारी अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक संपत वारके, महिला पोलिस कॉन्स्टेबल सुनिता साळुंखे, पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय कदम आणि निर्भया पथकाची संपूर्ण टीम सातत्याने योगदान देत आहे. या सर्वांनी मिळून केलेल्या कारवाईमुळे इस्लामपूर व तालुक्यातील सार्वजनिक ठिकाणी महिला व विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. निर्भया पथकाच्या कामगिरीमुळे तालुक्यातील महिला, मुली, नागरिक सुरक्षित असल्याचा निर्माण झाला आहे.