साखरपुडा झाला, पण लग्न झालं नाही…….

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगली होती. शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची दोनवेळा मातोश्रीवर भेट घेऊन बाहेरून पाठिंबा देण्याची मागणी केली होती. मात्र थेट आता ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आल्याने आता या मतदारसंघांमध्ये चौरंगी लढत झाली आहे. त्यामुळे या जागेचा निकाल कसा असणार? याचे उत्तर चार जून रोजीच मिळणार आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्थितीवरून भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की ही जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा हे अपेक्षित आहे. राजू शेट्टींच्या चर्चेला अंतिम स्वरूप देता आलं नाही. मात्र, महाविकास आघाडीची ताकद या मतदारसंघांमध्ये आहे. शिरोळ, हातकणंगले, शिराळा, शाहुवाडी, वाळवा आणि इस्लामपूरमध्ये महाविकास आघाडीची ताकद असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. राजू शेट्टी यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा होती. मात्र, साखरपुडा झाला पण लग्न झालं नाही असे सतेज पाटील मिश्किलपणे म्हणाले. त्यामुळे फटका कोणाला बसणार हे सांगता येणार नाही, पण महाविकास आघाडीची ताकद बेदखल करून चालणार नसल्याचे त्यांनी सुचित केले.