हातकणंगले मतदारसंघात चर्चेला उधाण…..

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हे इतकी चर्चा महायुतीच्या उमेदवारांबाबत होत आहे. अशातच खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांना मुंबईला पाचारण केल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा हातकणंगले मतदारसंघात चर्चेला तोंड फुटले.हे तिघेही बुधवारी कोल्हापुरात नसल्याने ही चर्चा आणखीनच वाढली; परंतु या चर्चेत कोणतेच तथ्य नसल्याचेही रात्री स्पष्ट झाले.

खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू झाली असताना दुसरीकडे माने आणि पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी माने यांचीच महायुतीची उमेदवारी अंतिम असल्याचे स्पष्ट केले असतानाही बुधवारी संध्याकाळनंतर महाडिक परिवार पुन्हा चर्चेत आला. हसन मुश्रीफ एका कार्यक्रमातून अचानक मुंबईला गेले. खासदार महाडिक आणि अमल, शौमिका यांनाही मुंबईला तातडीने बोलावल्याचे मेसेज सुरू झाले आणि याची खातरजमा करण्यासाठी कार्यकर्ते उतावीळ झाले.

याबाबत अधिक माहिती घेतली असताना खासदार महाडिक हे कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टरप्रमुख असल्याने ते साताऱ्याला गेल्याचे सांगण्यात आले, तर अमल महाडिक हे मंत्रालयात काम असल्याने तिकडे गेले, तर कौटुंबिक कारणामुळे त्यांच्यासोबत शौमिका महाडिक गेल्याचे सांगण्यात आले, तर हसन मुश्रीफ हे दोन दिवसांपूर्वीच मुंबईला गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हातकणंगलेच्या उमेदवारीच्या सुरू झालेल्या फेरचर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.