इचलकरंजी,
बांगलादेशातून (Bangladesh) आयात होणारे कापड, तयार कपडे, होजिअरी, महिलांची वस्त्र प्रावरणे यास भारत सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. गेली अनेक दिवस दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन चिनी निर्मीत कापड व त्यापासून तयार होणारे कपडे तसेच होजिअरी बांगलादेश मार्गे आयात शुल्क माफीच्या योजनेअंतर्गत भारतामध्ये मोठ्या प्रमाणात येत होते. त्यास विरोध करणेत आलेला होता.
हे आयात-निर्यात धोरणाचे उल्लंघन असलेचे वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय मुंबई, वस्त्रोद्योग मंत्रालय दिल्ली तसेच वस्त्रोद्योग मंत्री यांच्यापर्यंत पोहोचविले होते. त्याचबरोबर ना. सुरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान यांच्या समोर सादरीकरण करून त्याची माहिती दिलेली होती. तसेच इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग आले असताना माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने जे निवेदन दिलेले आहे. त्यामध्ये या आयात-निर्यात धोरणाचा फेरविचार करावा व बांगलादेशमधून आयात होणाऱ्या कापडावर त्वरीत बंदी घालावी अशी मागणी केली होती.
सध्याची दक्षिण आशियातील युद्धजन्य परिस्थितीतील व्यापार त्याचबरोबर देशातंर्गत वस्त्रोद्योगाची प्रलंबित मागणी लक्षात घेऊन भारत सरकारने बांगलादेशमार्गे येणारे सर्व वस्त्रोद्योग घटक भारतामध्ये आयात करणेस बंदी घातली आहे. इतर देशांना जाणारे वस्त्रोद्योग घटक आता फक्त जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबई येथे येऊन पुढे रवाना होतील. इतर कोणत्याही बंदरामध्ये बांगलादेशी कंटेनर पुढील वाहतुकीसाठी येणार नाहीत. या निर्णयामुळे ती संपूर्ण बाजारपेठ भारतातील वस्त्रोद्योजकांना खुली होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
