नवरात्र उत्सव सांगता मिरवणूकीवेळी नियमानुसार वाद्य बंद करण्यास सांगत असताना पोलिसांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हरिराम हरिगोविंद तिवारी (वय ४६ रा. सावली सोसायटी), संतोषकुमार सुदर्शनप्रसाद कुशवाह (वय ४४ रा. सुर्यानगर चंदूर), विवेक पांड्या (रा. कापड मार्केट) व पिंटु रॉय (रा. तुळजाभवानी अपार्टमेंट) अशी त्यांची नांवे आहेत या प्रकरणी पोलिस शिपाई रविंद्र वसंत महाजन यांनी फिर्याद दिली आहे.
तुळजाभवानी अपार्टमेंटमधील नवरात्र मंडळाची श्री दुर्गा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री दहा वाजता सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार रात्री दहानंतर वाद्य वाजविण्यास बंदी असल्याचे सांगत शहापूर पोलिस ठाण्याकडील पोलिस शिपाई यांच्यासह होमगार्ड यांनी वाद्य बंद करण्यास सांगितले. त्यावर उपरोक्त चौघांनी वाद्य चालू करा अन्यथा मिरवणूक पुढे नेणार नाही असे सांगत हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.