इचलकरंजीतील धार्मिक सलोखा राखण्यात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान आहे. आपल्या धर्माचा अभिमान बाळगत इतर धर्मांचा सन्मान करणे काय असते, हे संपूर्ण राज्याला येथील मुस्लिम समाजाने दाखवून दिले आहे. समाजातील एकता, अखंडता कायम टिकून राहण्यासाठी अशा उपक्रमांची आजही गरज असल्याचे प्रतिपादन माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी केले. त्याचबरोबर या संस्थेला क वर्ग मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करु. त्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कृष्णानगर येथील आधार लायब्ररीत आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्थेतर्फे आधार गौरव पुरस्कार प्रदान व आधार बैतुलमाल कमिटीमार्फत गरजू लोकांना खीर मसाला साहित्य वाटप कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज गैबान होते. यावर्षी संस्थेतर्फे बापूसो गौसनबीसो ढालाईत, ॲड. इरफान एम. जमादार, डॉ. मारुफ युसूफ हिरोली, शहानूर वहाब कमालशहा आणि राजू सरदार नदाफ यांना ‘आधार गौरव’ तर बद्रे आलम मिरासाब देसाई यांना ‘उत्कृष्ठ संचालक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या चंदर येथील राबिया महंमद मकुभाई हिला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वागत आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबुब मुजावर यांनी केले. प्रास्ताविकात आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर यांनी, संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आणि उपक्रमांचा आढावा घेतला. परवेज गैबान यांनी बैतुलमाल कमिटीच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन रफिक मुल्ला यांनी केले. आभार फरीद मुजावर यांनी मानले.