खानापूर घाटमाथ्यावर शेणखत ट्रॉलीला मिळतोय चांगला भाव…

खानापूर घाटमाथ्यावर टेंभूचे पाणी आल्याने द्राक्ष, ऊस व पालेभाज्या शेतीमध्ये वाढ होऊ लागली आहे. द्राक्ष व ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आहे. रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा या पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुढील हंगामाच्या तयारी लागले आहेत. सर्व पिकांच्या चांगल्या उत्पन्नासाठी रासायनिक खताबरोबर शेणखतालाही खूप महत्त्व आहे. पिकाची नैसर्गिक गुणवत्ता टिकवण्यासाठी शेणखत खूप गरजेचे असते, त्यामुळे शेणखताची मागणी वाढली आहे.द्राक्ष शेतीमध्ये खरड छाटणी पूर्वी शेतामध्ये शेणखत पसरण्याची लगबग सुरू झाली आहे.

खानापूर घाटमाथ्यावर उन्हाळी पाऊस झाल्यामुळे शेतातील नांगरणीच्या कामांना वेग आला आहे, तसेच शेतातील पिके निघाल्यामुळे शेणखत सध्या ट्रॅक्टरचालकांचे शेणखत भरुन शेतकऱ्यांना पुरवण्याचे काम सुरु आहे. वाहतुकीला कोणताही अडथळा नसल्यामुळे शेतात शेणखत पसरण्याच्या कामाला गती आली आहे. गेल्या काही वर्षांच्या दुष्काळामुळे भागात गाई-म्हशींची संख्या कमी झाली आहे व मागणी जास्त असल्याने .शेणखताच्या दरात चांगलीच वाढ झाली असून, ट्रॉलीला साधारणपणे सहा हजारांपर्यंत दर मिळत आहे. शेणखताच्या खेपा भरून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पुरवण्याची काम जोमात सुरू आहे.