अनेक शहरात वाहतुकीचा प्रश्न खूपच जोर खात आहे. पार्किंग व्यवस्था अस्ताव्यस्त होत असल्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. घाटमाथ्यावरील मुख्य बाजारपेठ अशी खानापूरची ओळख आहे. शहरामध्ये बँका, हॉस्पिटल, मेडिकल, किराणा माल दुकान, व शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने घाटमाथ्यावरील वीस ते बावीस गावांतील लोक दैनंदिन व्यवहारासाठी या ठिकाणी येत असतात. खानापूरमध्ये शुक्रवारी मोठा आठवडी बाजार भरतो.
गुहागर विजापूर महामार्गाच्या कामामुळे ही बाजारपेठ मोठ्या प्रमाणात महामार्गाकडेला विस्तारू लागली आहे मात्र परिसरात पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनधारक बेजबाबदारपणे महामार्गाकडेलाच वाहने उभी करत आहेत. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. बसस्थानकासमोर व मुख्य शिवाजी चौकामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे.
मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक ते राम मंदिर चौक या परिसरामध्ये सायंकाळी पाच वाजल्यानंतर रस्त्याच्या कडेला
बेजबाबदारपणे दुचाकी व चारचाकी व्यापाऱ्यांच्याकडून होत आहे. वाहने उभी केली जात असल्याने मोठी वाहतूक कोंडी होते. यामुळे वाहनधारकांमध्ये वादावादीचे प्रसंग रोजचे झाले आहेत. खानापूर शहरांमध्ये पार्किंग व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
