अधिवेशनात खानापूर विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न मांडला त्यावर शिक्षणत्र्यांनी विद्यापीठ उपकेंद्राची घोषणा केली, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया देत विद्यापीठ उपकेंद्र हे अत्यंत दर्जेदार शैक्षणिकदृष्ट्या माईलस्टोन ठरणारे असेल त्याच्या उभारणीत सरकारचा प्रतिनिधी आणि या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी बारकाईने काम करेन, असा विश्वास व्यक्त आमदार सुहास बाबर यांनी केला. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूरलाच व्हावे, हे स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे स्वप्न होते. एकदा नव्हे तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि भाषणांमधून शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूरलाच होणार, असा निर्धार अनिलभाऊंनी व्यक्त केला होता.
मध्यंतरीच्या काळात या प्रश्नाला गती मिळाली नाही आणि हे उपकेंद्र सन २०२१ च्या दरम्यान तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथे हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आमदार म्हणून अनिलभाऊंनी त्यावेळेस एकदम टोकाची भूमिका घेतली होती. व बस्तवडे येथील पाहणी दौरा एका दिवसात रद्द करावा लागला. त्यावेळी तत्कालीन मंत्री उदय सामंत यांनी उपकेंद्र अन्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय रद्द केला होता. आता आपल्यापुढे हे उपकेंद्र खानापूरलाच व्हावे आणि स्वर्गीय अनिलभाऊंचे स्वप्न साकारले जावे हा एक मोठा ध्यास होता.
विधानसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्याच्या काळात मी पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून माझ्यासह विविध नेतेमंडळी प्रयत्नशील होती. महायुतीच्या विरोधात लोकांना भडकवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी याप्रश्री लक्ष घालण्याचे निवेदन दिले. त्यानंतर आज सभागृहात मी व आमदार गोपीचंद पडळकर यांनी याप्रश्री आजच घोषणा व्हावी, अशी आग्रही मागणी केली. अखेर माझ्या कार्यकाळात आणि माझ्या आमदारकीच्या पहिल्या तीन महिन्यातच एवढा प्रचंड मोठा प्रश्न सोडवून सरकारने आमच्यावर सार्थ विश्वास दाखवला आहे, या केंद्राच्या उभारणीत लोकप्रतिनिधी म्हणून मी बारकाईने काम करेन, असा विश्वास व्यक्त करून तमाम दुष्काळी भागाच्या वतीने मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानत असल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले.