सध्याच्या काळात एकजुटीने राहणे आवश्यक असून, आपल्यासमोर शाश्वत विकासाचे मोठे आव्हान आहे. विकास ही फक्त राजकीय लोकांची जबाबदारी नाही, तर आपलीही आहे. आपल्या वैयक्तिक गरजा कशा कमी करता येतील हे पाहावे लागेल आणि येत्या काळात आपणाला निसर्गाकडे जाण्याशिवाय पर्याय नाही; कारण, सगळ्या प्रश्नांची उत्तरे निसर्गातच लपली आहेत, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी येथे केले. इस्लामपूर येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने डॉ. विवेक देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान झाले. यावेळी ‘विज्ञान, धर्म आणि समाज’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्ष डॉ. दीपक स्वामी, प्रा. श्यामराव पाटील, प्राचार्य दीपा देशपांडे, मसापचे जिल्हा प्रतिनिधी दशरथ पाटील प्रमुख उपस्थित होते.