शिवसेना शिंदे गटाचे माढा लाेकसभाप्रमुख संजय कोकाटे यांनी शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचा पंचा गळ्यात घालून त्यांचे स्वागत केले.
पवार गटाच्या मुंबई कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
संजय काेकाटे यांच्यासाेबत शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख रामचंद्र टकले, शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा उपप्रमुख विनोद पाटील, आहेरगावचे सरपंच सुभाष पाटील, विद्यार्थी संघटनेचे सुनिल गव्हणे यांचाही प्रवेश झाला. या कार्यक्रमाला पवार गटाचे प्रदेश निरीक्षक शेखर माने, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माढ्याचे संजय पाटील घाटणेकर, पंढरपूरचे अभिजीत पाटील यांची प्रमुख उपस्थितीत हाेती.जयंत पाटील म्हणाले, पवार गटाकडे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत.
तर दुसऱ्या बाजूला सत्तारूढ पक्षाकडे कंत्राटदार आहेत. आमच्या पक्षात एखाद्या व्यक्तींनी प्रवेश केला तर त्यांच्या मागे तपास यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. निवडणुका जर जाहीर झाल्यास तपास यंत्रणेने आपलं काम थांबवलं पाहिजेत. एखादा पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार म्हणून जर रिंगणात असेल तर त्या नेत्यांवर तुम्ही कारवाई करत आहात याचा अर्थ तुम्ही लोकशाही विरोधात आहात असा अर्थ देशातील जनता काढू शकते, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.