महाभारतामध्ये एकलव्याने एक अंगठा दिला होता, परंतू, देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्त्वासाठी सदाभाऊ खोत दोन अंगठे देखील द्यायला तयार असल्याचे वक्तव्य रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केलं.फडणवीसांवर माझी एवढी निष्ठा असल्याचे खोतांनी सांगितलं. इस्लामपूर इथं रयत क्रांती संघटनेचा मेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यात सदाभाऊ खोत बोलत होते.
सदाभाऊ खोत हे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आहेत. हा पक्ष भाजपचा मित्रपक्ष आहे. मात्र, सदाभाऊंच्या रयत क्रांती संघटनेला लोकसभेची एकही जागा देण्यात आली नाही. सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांमा महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही. महायुतीकडून हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील मानेंना तिकीट देण्यात आलंय. त्यामुळं तिथं आता तिरंगी सामना होणाराय. स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे राजू शेट्टी तर दुसरीकडून ठाकरे गटाचे सत्यशील पाटील निवडणुकीच्या मैदानात आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महायुतीतील घटक पक्षांच्या उपस्थितीमध्ये इस्लामपूरमध्ये शेतकरी कामगार परिषद आयोजीत केली होती. त्यावेळी सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले मधून मला महायुतीकडून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, त्यांना काही उमेदवारी मिळाली नाही. अखेर शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली. 2019 पासूनच मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तयार करत असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले होते. त्यामुळं हा मतदारसंघ रयत क्रांतीला मिळावा अशी भूमिका सदाभाऊ खोत यांनी मांडली होती.