वसतिगृहातून गायब सात मुलं जंगलात….

नवोदयसह निरनिराळ्या परीक्षांच्या तयारीसाठी वसतिगृहात प्रवेश घेतलेले सात अल्पवयीन विद्यार्थी बुधवारी सकाळी अचानक वसतिगृहातून गायब झाले. दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने राबवलेल्या तीन तासांच्या शोधमोहिमेमुळे ते सर्व विद्यार्थी तळेवाडी हद्दीतील जंगलात सुखरूप आढळले.

त्यामुळे क्लासचालक, पालकांसह पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.हकीकत अशी, नेसरी-चंदगड रोडवरील एका खासगी क्लासेसमध्ये ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची नवोदय, शिष्यवृत्ती, राष्ट्रीय प्रज्ञाशोध, सैनिक स्कूल प्रवेश आदी परीक्षांची तयारी करून घेतली जाते.

त्याठिकाणी ८० मुला-मुलींनी प्रवेश घेतला असून त्यांच्यासाठी वसतिगृहाची सोयदेखील केली आहे.बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘त्या’ क्लासमधून ७ विद्यार्थी अचानक बाहेर पडले. वसतिगृहासह परिसरात शोधाशोध करूनही ते न सापडल्यामुळे घाबरगुंडी उडालेल्या क्लासचालकांनी नेसरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

नेसरी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक रोहित दिवसे यांनी तातडीने यासंदर्भातील संदेश ‘व्हॉटस्ॲप’वरून परिसरातील विविध गावातील ग्रुपवर पाठवला. त्या मुलांच्या शोधासाठी खास पथक तयार करून त्यांनी नेसरी परिसरात शोधमोहीम राबवली. त्यामुळे ते सर्व विद्यार्थी सुखरूप मिळून आले. त्या मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मुला-मुलींच्या वसतिगृहात पुरेसे शौचालय नसून अनेक गैरसोयी असल्यामुळे घरी जाण्यासाठी आम्ही क्लासमधून बाहेर पडलो होतो, असे ‘त्या’ मुलांनी पोलिसांना सांगितले असून, ते सर्वजण चंदगड तालुक्यातील असल्याची चर्चा आहे.