संपूर्ण महराष्ट्रात रात्रीची भरणारी यात्रा म्हणून परिचित असलेल्या रेवणगाव (ता. खानापूर) येथील ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वेताळगुरुदेवाची यात्रा उद्या मंगळवार, दि. ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्यादिवशी साजरी करण्यात येत आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रेवणगाव येथील ग्रामदैवत श्री वेताळगुरू देवाची यात्रा चैत्र गुढीपाडव्यादिवशी असते. यावर्षी ही यात्रा मंगळवार व बुधवारी साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त गावात श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणात गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता होत आहे.
मंगळवारी रात्री ९ वाजता श्रींचा पालखी सोहळा होत असून शोभेच्या दारूची आतषबाजीही होणार आहे. तर, यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आणि कुस्तीचे मैदान होणार आहे. श्री वेताळगुरुदेव मंदिर परिसरात विलास मुळीक व काशीनाथ मुळीक यांनी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. यात्रेसाठी येणाऱ्या हजारो भाविकांनाही वेताळगुरुदेव विकास परिसराचे जनक विलास मुळीक यांनी वीज, पाणी, निवास, पार्किंग यासह अन्य सुविधा पुरविल्या आहेत.
श्री वेताळगुरुदेवाची यात्रा रात्री भरत असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेता विटा पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच वेताळगुरुदेव परिसर विकासाचे व्यवस्थापक विलास मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली १६ स्वयंसेवक कार्यरत आहेत. विटा आगारातून भाविकांच्या सेवेसाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.