सांगलीतील अनोखा दोस्ताना चर्चेत !

सांगली जिल्ह्याच्या राजकीय पटलावर सध्या अनोखा दोस्ताना चर्चेत आला आहे. मित्रपक्ष असूनही काँग्रेस व उद्धव सेना एकमेकांशी शत्रुभाव जपू लागलेत, तर उद्धव सेना व भाजप नेत्यांच्या स्नेहभोजनाने नव्या
राजकीय समीकरणांची खिचडी तयार केली आहे.

हातकणंगले मतदारसंघातही स्वाभिमानी शेतकरी ऑफर पक्षाशी सलगी करीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनोख्या मैत्रीची डाळ शिजवली आहे. सांगली व हातकणंगले मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांनी जन्म घेतला आहे. उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांच्या सांगली हातकणंगले जिल्हा दौऱ्यात या समीकरणांचा रंग राजकीय अधिक गडद झाला. सांगलीच्या जागेवरून उद्धव सेना काँग्रेसमध्ये दरी निर्माण झाली आहे.

दोन्हीकडील नेते ऐकमेकांवर जहरी टीका करीत आहेत. त्यांच्यात उघडपणे युद्ध सुरु असताना मनोमिलनाचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाहीत. राऊत यांच्या दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांनी पाठ फिरवली. प्रसंगी काँग्रेसशिवाय निवडणूक लढविण्याचा इशारा देत राऊत यांनी शत्रुत्वाचा करार मान्य केला. काँग्रेसशी वादाच्या ठिणग्या उडत असताना राऊत यांनी भाजपचे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांची भेट घेऊन मैत्रीचे फटाके फोडले. त्यांच्यासमवेत चर्चा अन् स्नेहभोजनाचा आस्वाद त्यांनी घेतला.

जगताप यांनी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांच्याशी उघड पंगा घेतला आहे. त्यामुळे ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या तत्त्वाने त्यांनी जगतापांची गळाभेट घेतली. याच तत्त्वाने ते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनाही भेटले. त्यामुळे शिवसेनेचा हा अनोखा दोस्ताना सांगलीच्या राजकीय पटलावर चर्चेत आला आहे.