व्यावसायिक पातळीवर शेती करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यात कधी शेतमालाला योग्य बाजार भाव मिळत नाही तर कधी निसर्गाचा प्रकोप. कधी उत्पादन कमी तर कधी बाजारपेठ नाही. या आणि अशा अनेक समस्यांमुळे शेतकऱ्यांना शेती करावी की नाही हा प्रश्न आता भेडसावत आहे. या समस्यांमुळे अनेकदा शेती ही फायद्याची कमी आणि तोट्याची जास्त ठरते. पण शेतीतून अधिक उत्पन्न हवं असेल तर यासाठी शेतीपूरक व्यवसाय करणं गरजेचं आहे. शेतीपूरक व्यवसायामुळे शेतीचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो तसंच अधिकच्या उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होतो. आधीच शेती तोट्यात त्यात शेतीपूरक व्यवसाय कसा करावा आणि कोणता करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. तर आम्ही तुम्हाला असे शेतीपूरक व्यवसाय सांगणार आहोत ते तुम्हाला फायद्याचे ठरू शकतात आणि तुम्हाला चांगलं उत्पन्नही मिळवून देऊ शकतात. शेतीपूरक व्यवसाय हे तुमच्या शेतीवर आणि पशुधनावर आधारित असल्याने गुंतवणूक कमी असते. अनेक व्यवसायांसाठी शासनाकडून अनुदानही उपलब्ध करून दिलं जातं. सुरुवातील लहान स्तरावर शेतीपूरक व्यवसाय सुरू करून तुम्ही कालांतराने त्याचा विस्तार वाढवू शकता.
1. दुग्ध व्यवसाय- दुग्ध व्यवसाय हा भारतातील परंपरागत शेती पूरक व्यवसाय आहे. गोपालन किंवा म्हैस पालन करून हा व्यवसाय करू शकतो. यासाठी तुमच्या शेतातील पीकाचा चारा किंवा ज्वारी बाजरीचा कडबा पशुखाद्य म्हणून वापरल्यास खर्च कमी होईल. शिवाय जनावरांच्या मलमूत्राचा शेतात खत म्हणून वापर करू शकता. सुरुवातीला कमी जनावरं ठेवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि कालांतराने व्यवसाय वाढवू शकता. कारण भारतात दूधाची मागणी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
2. शेळीपालन- शेळीपालनातूनही शेतकरी चांगला नफा मिळवू शकतो. अखेर शेळी ही गरीबांती गाय म्हणून ओळखली जाते. मात्र ती शेतकऱ्याला श्रीमंत देखील करू शकते. शेळी ही कोणत्याही वनस्पतीवर जगते. मग तो कोणताही पालापाचोळा असो.त्यामुळे पशुखाद्यावर जास्त खर्च होत नाही. पुरेशी जागा उपलब्ध असेल तर हा व्यवसाय करणं फायदेशीर ठरेल. शेळीच्या आणि मेंढीच्या मांसाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून त्याला भावही चांगला मिळतो. खास करून हॉटेल व्यवसाय विस्तारल्याने मागणी वाढली आहे. शेळीपालन हा कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा व्यवसाय आहे.
3. भाजीपाला शेती- धान्यांसोबत रोजच्या जिवनातील महत्वाचा घटक म्हणजे भाजीपाला. रोजच्या जेवणासाठी घराघरात भाजीपाला गरजेचा असतो. म्हणजेच मोठी मागणी असणाऱ्या भाजीपाला लागवडीमुळे अधिकच उत्पन मिळू शकतं. योग्य नियोजन करून भाजीपाला लागवड केल्यास शेतकऱ्याला चांगला नफा मिळवणं शक्य आहे. अलिकडे सेंद्रिय भाजीपाल्याला मोठी मागणी आहे. त्यामुळे तुम्ही सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवून त्याचं योग्य मार्केटिंग केल्यास फायदा होईल.