भिलवडी (ता. पलूस) येथे दि. १८ रोजी तसेच १९ ऑगस्ट दरम्यान भिलवडीच्या मुख्य बाजार पेठमध्ये एकाचवेळी दोन ठिकाणी
चोरी झाली. पलूस तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. १५ रोजी पलूस तालुक्यातील वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे यांची आमदार विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत भिलवडीमध्ये आढावा बैठक घेतली होती. तरी देखील चोरट्याने १८ रोजी भिलवडीमधील मुख्य बाजारपेठेमध्ये दोन ठिकाणी चोरी केली. यामध्ये एका चोरीत अशोक जाधव यांच्या हॉटेल राजकमल येथे मागील बाजूस पत्र्याचे पान उचकटले आणि आत प्रवेश करून सिलिंडरच्या दोन टाक्या लंपास केल्या.
दुसरी चोरी याच मुख्य रस्त्यावर शंकर नरशू शेटे यांच्या किराणा दुकानात चोरट्यांनी आत प्रवेश करून साहित्य विस्कटले. पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ दोन्ही ठिकाणी जाऊन पाहणी केली. या चोरीमुळे भिलवडीमधील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भिलवडी गावात नागरिकांकडून गस्त घालत आहेत. भिलवडी पोलिसांकडून आरोपीचा शोध चालू आहे.