भल्या सकाळी विशाल पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला

सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठा पणाला लावून चंद्रहर पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली असली तरी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची चिन्ह आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार भूमिकेत असलेल्या काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने सांगलीच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

त्यामुळे विशाल पाटील आता वंचितच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.  प्रकाश आंबेडकर आता काय निर्णय घेतात? याकडे सुद्धा लक्ष असेल. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. काँग्रेसने आधीच ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्यांना आपला अस्तित्व ठेवायचे की नाही? अशी विचारणा केली आहे.

दरम्यान सांगलीमध्ये शिवसेनेत ताकद नसल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की आज सकाळी विशाल पाटील मला भेटून गेले आहेत. त्यामुळे पुढील निर्णय लवकरच घेऊ. सध्या कुठलाही आग्रह केलेला नाही किंवा कुठलीही सजेशन दिलं नसल्याचे आंबेडकर म्हणाले.