महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगली लोकसभेची जागा जवळपास काँग्रेसला मिळाली आहे. त्यामुळे सांगली लोकससभेचा उमेदवार कोण याची चर्चा सुरू झालीय. वास्तविक मागच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभेची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला आली होती. त्यावेळी स्वाभिमानीने काँग्रेसचे नेते आणि वसंतदादाचे नातू विशाल पाटीलयांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे काँग्रेस यंदाही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपद असलेल्या विशाल पाटील यांच्याच गळ्यात लोकससभा उमेदवारीची माळ टाकण्याची जास्त शक्यता आहे.
सांगली लोकसभा मतदार संघ हा तसा काँग्रेसचा पर्यायाने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीवेळी मोदी लाटेमध्ये काँग्रेसचा गड नेस्तनाबूत करीत भाजपने या ठिकाणी विजयी पताका खासदार संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून रोवली.जिल्ह्यात सध्या कॉंग्रेसचे नेतृत्व विश्वजित कदम यांच्याकडे आहे. विशाल पाटील यांनी देखील आपण आता विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सांगत पतंगराव कदम आणि वसंतदादा घराण्यातील वाद थांबवलाय.
काँग्रेसचे सक्रिय नेते, कुस्ती आणि खेळाची आवड, सांगलीत वसंतदादा महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक कला जोपासण्याचे काम ते करत आहेत. काही वर्षांपूर्वी बंद पडलेला सांगलीचा वसंतदादा साखर कारखान्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तो कारखाना अडचणीतून बाहेर काढलाच शिवाय कारखाण्याकडून शेतकऱ्यांची देणी आणि बिले सुद्धा भागविली. विशाल पाटील हे आधीपासून सांगली विधानसभा साठी इच्छुक होते, मात्र त्यांच्यावर थेट लोकसभेचे उमेदवार म्हणून जबाबदारी टाकण्यात आली.