शाळेला सुट्टी मिळताच पहिल्याच दिवशी घडलेल्या प्रकाराने सांगोला तालुका हादरून गेला आहे. पोहता येत नसणाऱ्या दोन चिमुकल्या बहीण भावाचा शेततळ्यातील पाण्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना राजुरी (ता. सांगोला) येथे दि. ८ एप्रिल रोजी घडली. प्रतिक्षा आबा कुटे (११) व ओम आबा कुटे (७) अशी मृत्यू पावलेल्या भावंडांची नावे आहेत.
याबाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकात्यांनी सांगोला पोलीसात दिलेली अशी खबर दिली की, राजुरी (ता. सांगोला) येथील प्रतिक्षा आबा कुटे व ओम आबा कुटे ही पोहता न येणारी दोघे शाळकरी भाऊ बहीण शेततळ्यात पडली होती.
त्यांना सांगोला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाली असल्याचे सांगितले. याबाबत सांगोला पोलीस स्टेशनमध्ये वैद्यकीय अधिकात्यांनी खबर दिली आहे.घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या शेततळ्यातील पाण्यात बुडालेल्या प्रतिक्षा आबा कुटे हिने नाझरा (ता. सांगोला) येथे इयत्ता ५ वीची तर ओम आबा कुटे याने गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता १ लीची परीक्षा दिली होती.
शाळेला सुट्टी लागल्याने बहिण भाऊ फिरत फिरत शेत ताळ्यावर पोहचले.परंतु दोघेही बराच वेळ घराकडे न आल्याने त्याचा शोधा शोध घेतला असता ओमचे कपडे तळ्याच्या काठावर दिसल्याने त्याचा शोध घेतला असता दोघेही तळ्यात बुडल्याचे नातेवाईकांना दिसून आले.त्यांना लागलीच पाण्यातून बाहेर काढत सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.