दिपकआबांनी व्यक्त केली नाराजी, शहाजीबापूंनी मोठ्या भावाची जबाबदारी पार पाडायला हवी होती

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दीपक साळुंखे (Deepak Salunkh) यांनी कार्यकर्त्यांची चिंतन बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत बोलताना शहाजीबापू यांनी घेतलेल्या भूमिकेवर दीपक साळुंखे यांनी बोट ठेवले आहे. ते म्हणाले, आमचे मोठे भाऊ आणि सांगोला तालुक्याचे कुटुंबप्रमुख म्हणून शहाजीबापू पाटील यांनी एकत्र राहण्याची भूमिका घ्यायला हवी होती.

आपण एकत्र राहू, असे मी गेली दोन वर्षांपासून शहाजीबापूंना (Shahajibapu Patil) सांगत होतो, त्यासाठी आग्रह करत होतो. एकत्र राहण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. वरिष्ठ नेतेमंडळींना भेटून आपण दोघांनीही आपापली भूमिका मांडूया, यासाठी मी शहाजीबापूंकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. आमचे मोठे भाऊ म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडायला हवी होती, मात्र त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही, असेही दीपक साळुंखेंनी स्पष्ट केले.साळुंखे म्हणाले, सांगोला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनेच आपला पराभव केला आहे. पण पराभवामुळे मी खचून जाणार नाही, त्यामुळे कार्यकर्ते सांगतील, तेच आमचे धोरण असेल.

माजी आमदार साळुंखे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवली. निवडणुकीत मी माझ्या पूर्वजांची पुण्याई सांगत बसलो नाही. जाती पातीचे राजकारण करून मते मागितली नाहीत, त्यामुळे पराभवालासुद्धा ताठ मानेने समोरे गेलो. जनतेनेही पैशाच्या राजकारणाला कंटाळून तालुक्यातील स्वाभिमानी ५१ हजार मतदारांनी मला मतदान केले. या स्वाभिमानी जनतेच्या पाठिंब्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार आहे.