शेअर बाजारात गुंतवणूक करणारे बहुतेक गुंतवणूकदार मल्टीबॅगर स्टॉकच्या शोधात असतात जेणेकरून त्यांना अल्पावधीत दमदार परतावा मिळू शकेल. असाच एक स्टॉक म्हणजे बांधकाम बांधकामापासून ते सिंचन, खाणकाम आणि रेल्वेच्या बांधकामापर्यंत सर्वच कामांमध्ये गुंतलेली NCC कंपनीचा आहे ज्याने लॉन्ग टर्म (दीर्घकाळ) मध्येच नाहीतर अल्पावधीत गुंतवणूकदारांचे खिसे भरले आहेत.
कधी काळी एक रुपयापेक्षा कमी किंमत असलेल्या NCC शेअरचा भाव १६३ रुपयांवर पोहोचला आहे, तर गेल्या वर्षभरात या मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांच्या पैशांमध्ये अडीच पट उडी घेतली. एवढच नाही तर ब्रोकरेजच्या मते NCC शेअर्समधील तेजी अद्याप थांबलेली नाही आणि सध्याच्या पातळीपासून ३१% पर्यंत मुसंडी मारू शकते.
NCC स्टॉकचे मल्टीबॅगर रिटर्न्स
गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे नऊ टक्क्यांची वाढ झाली असून, गेल्या सहा महिन्यांत शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे ५०% नफा दिला आहे. तसेच २०३ मध्ये NCC या मल्टीबॅगर स्टॉकने ७८% रिटर्न्स नोंदवले आहेत. अशा स्थितीत वार्षिक परताव्याबद्दल बोलायचे तर ते १३३% आहे.
हजारांची गुंतवणूक कोटी झाली
दीर्घकाळात NCC समभागांनी भरभरून परतावा दिला असून सुमारे २२ वर्षांपूर्वी ५ ऑक्टोबर २००१ रोजी शेअरची किंमत केवळ ८९ पैसे होती. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यावेळी या शेअरमध्ये ५५ हजार रुपये गुंतवले असेल आणि आजपर्यंत कायम ठेवले असतील तर आज त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य एक कोटी रुपये झाले असेल कारण आता स्टॉकची किंमत १६३ रुपये झाली आहे.
जून तिमाहीत महसूल आणि नफ्यात वाढ
जून तिमाहीत एनसीसीचा एकत्रित महसूल वार्षिक ३१.८९% वाढून ४३८० कोटी रुपये झाला तर कंपनीचा नफा ३३% वाढून ४०९ कोटी रुपये झाला आहे. जून तिमाहीत कंपनीला ८१५४ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या, जे वार्षिक आधारावर ८३% अधिक असून त्यांची ऑर्डर बुक ५४,११०कोटी रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये सर्वात मोठी ऑर्डर यूपी जल जीवन जल प्रकल्पाची आहे ज्याची किंमत १६,५०० कोटी रुपये आहे.