आमदार जयंत पाटलांनी व्यक्त केली भीती!

आपण गांभीर्याने घेतले नाही, तर ही लोकसभेची शेवटची निवडणूक ठरेल, याचे भान ठेवून कामाला लागा. भाजपाने गेल्या दहा वर्षांत देशावर 205 लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. निवडणुका झाल्यावर हे कर्ज फेडण्यासाठी भाजपवाले 18 टक्के जीएसटी आणि इतर कर वाढवू शकतात.

त्यामुळे त्यांना निवडणुकीतून हद्दपार करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रचाराचे प्रभावी नियोजन करावे. कोणी घरी येऊन बसले, चहाला आले हे टाळा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी केले.हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. यावेळी सरोज पाटील, माणिकराव पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, अभिजीत पाटील, प्रतीक पाटील, विराज नाईक उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ईश्वरपूर विधानसभा मतदारसंघात जेवढे मताधिक्य मिळते, तेवढे मताधिक्य सत्यजित पाटील-सरूडकर यांना देण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडावी. सत्यजीत आबा पाटील यांना दहा वर्षांचा अनुभव असून, ते केंद्र सरकारकडून अनेक विकासकामांना गती देऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जागावाटपात जे झाले ते झाले, सर्वांनी आघाडी धर्म पाळायला हवा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.