इस्लामपूर-शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपची पुन्हा नवी खेळी सुरू

हातकणंगले लोकसभा, इस्लामपूर-शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपची पुन्हा नवी खेळी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगातून घुसखोरी करण्याचा डाव आखला आहे.भाजप आणि अजित पवार गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देण्याचे राजकारण शिजत असल्याचे संकेत आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खा. धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांकडून हातकणंगले लोकसभेसाठी राहुल आवाडे यांच्या उमेदवारीसाठी खतपाणी घालून शिंदे गटाला शह देण्याचे कट कारस्थान सुरू आहे.

इस्लामपूर- शिराळा मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, हातकणंगले लोकसभेचे प्रमुख सत्यजीत देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, राज्य कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील आदी युवकांची मोट बांधण्यासाठी भाजप पुन्हा रंगभरणी करत आहे.

या सर्वच नेत्यांचे टार्गेट आ. जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक आहेत.दोन्ही मतदारसंघात साखर सम्राटांचे नेते आ. जयंत पाटील आणि आ. मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी ऊस उत्पादकांची ताकद एकवटली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इस्लामपूर- शिराळाच्या सिमेला असलेल्या पुणे- बेंगलोर महामार्गालगत साखर कारखानदारीला पूरक असलेला इथोनॉलचा प्रकल्प उभा करत गट निर्माण करण्याची खेळी केली आहे.

इस्लामपूर मतदारसंघात भाजपकडून निशिकांत पाटील यांचे नाव पुढे आहे. हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जातो. तरीही या मतदारसंघात भाजपची चाचपणी सुरूच आहे. त्यातच महाडिक गटाचे राहुल आणि सम्राट महाडिक वाळवा तालुक्यात आपला गट सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विक्रम पाटील, भाजप प्रणित रयत क्रांती शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांचा विसर भाजपला पडला आहे.