सहा मिनिटांच्या ‘त्या’ सीनसाठी 60 कोटींचा खर्च, ‘पुष्पा 2’ टीझरमधील

 अल्लू अर्जुनच्या  ‘पुष्पा 2: द रूल या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला. जवळपास 68 सेकंदाच्या टीझरमध्ये  फक्त एकच  सिक्वेन्स दिसला होता. यामध्ये अल्लू अर्जुनच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. हा गेटअप, लूक इतका पॉवरफूल होता की ‘पुष्पा 2’चा टीझर अनेकांनी पाहिला. अल्लू अर्जुनच्या लूकवर अनेकांना प्रश्न पडले होते. टीझरमधील अल्लूचा हा लूक धार्मिक उत्सवाशी संबंधित आहे. तिरुपती गंगम्मा जत्रेशी  संबंधित हा उत्सव आहे. या जत्रेच्या मागे महिलांच्या मान-सन्मानाशी निगडीत एक पुराणकथा आहे. 

लोककथा आणि पौराणिक कथांनुसार, श्री तैय्यागुंता गंगाम्मा ही तिरुपती शहराची ग्रामदेवी मानली जाते. अनेक कथांमध्ये ती भगवान वेंकटेश्वर स्वामींची बहीण असल्याचेही म्हटले आहे. असे म्हटले जाते की, काहीशे वर्षांपूर्वी तिरुपती आणि आसपासच्या भागात पलागोंडुलुचे राज्य होते, तेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या  घटना शिगेला पोहोचल्या होत्या.

पालेगोंडुलु महिलांवरील छळ, बलात्कार आणि प्राणघातक हल्ल्यांमध्ये सामील होता. यावेळी अविलाला नावाच्या गावात देवी गंगामाचा जन्म झाला. तारुण्यात आल्यानंतर ती सौंदर्यवती झाली. जेव्हा पलागोंडुलुने देवी गंगामाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवीने तिच्याकडील सामर्थ्याने हल्ल्याला भयंकर उत्तर दिले.

त्यानंतर पालेगोंडुलु घाबरला आणि पळून जाऊन लपला. त्याला  बाहेर काढण्यासाठी गंगम्माने ‘गंगा जत्रा’ची योजना आखली. यामध्ये लोकांना आठवडाभर विचित्र वेशभूषा करून 7 दिवस गंगामाला टोमणे मारावे लागले. सातव्या दिवशी पालेगोंडुलु बाहेर आला तेव्हा गंगाम्माने त्याला मारले. या घटनेचे स्मरण करून, देवी गंगाम्माबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा सण आजही साजरा केला जातो.

या जत्रेत  पुरूष महिलांची वेषभूषा करतात. त्यांच्याप्रमाणेच ते साडी नेसतात, दागिने घालतात. अशा प्रकारे ते देवी गंगाम्मा आणि स्त्रीत्वाबद्दल त्यांचा आदर व्यक्त करतात. जत्रेच्या सात दिवसात लोक वेगवेगळ्या वेशभूषा करतात, ज्यामध्ये अनेक नियम आहेत. एका वृत्तानुसार, अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2’ च्या ट्रेलरमध्ये ज्या गेटअपमध्ये दिसत आहे तो जत्रेच्या पाचव्या दिवशी असलेला ‘मातंगी वेषम’ आहे.