मंत्री छगन भुजबळ यांचा आमचा व्यक्तिगत विरोध नाही. आम्हाला टीका करायची, म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. पण मराठा आरक्षणाला विरोध केला तर कुणालाच सोडणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच ग्राउंड लेव्हलवर मराठा आणि ओबीसी दोन्ही बांधव एकत्र आहेत, असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. ते येवला येथे बोलत होते.
काही दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला येथे मनोज जरांगे पाटील यांची मराठा संवाद सभा झाली होती. यावेळी मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी मिरवणूक काढण्यात आली होती. पण जेसीबीतून फुलांची उधळण करत असताना लोडर पलटी होऊन दुर्घटना घडली. यामध्ये चार जण जखमी झाले होते. त्यापैकी गोकुळ रावसाहेब कदम या तरुणाच्या डोक्याला मार लागला होता.
दरम्यान, जरांगे यांनी मंगळवारी रात्री उशिरा कोपरगाव येथील एस जे एस रुग्णालयात गोकुळ कदम आणि त्यांच्या नातेवाइकांची भेट घेतली. यावेळी रुग्णाची योग्य ती काळजी घेण्याची विनंती मनोज जरांगे यांनी डॉक्टरांना केली. काही तरुणांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वतीने रोख स्वरूपाची मदत जखमीच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केली.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, माणुसकीच्या नात्याने जर या समाज बांधवाला मदत करण्यात येत असेल तर ठीक आहे. मात्र, राजकारण म्हणून जर कोणी मदत करत असेल तर मदत न केलेली बरी. समाज बांधव मदतीसाठी सक्षम असल्याच जरांगे यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे रुग्णालयाच्या बाहेर पडताच मोठ्या संख्येने जमलेल्या तरुणांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी तरुणांनी एक-मराठा-लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. यावेळी जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. जखमी झालेल्या व्यक्तीची प्रकृती बरी आहे.
सरकार किती दिवस आम्हाला वेदना देणार आणि आमचे बळी घेणार? हे मात्र समजायला तयार नाही. प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली आहे. त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. असं जरांगे यांनी म्हटलं आहे. ४० दिवसानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. मंत्री छगन भुजबळ यांना आमचा व्यक्तिगत विरोध नाही. पण आरक्षणाला विरोध केला तर कुणालाच सोडणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.