शिंदे गटाला मोठा धक्का, बडा नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरुन नव्याने पक्षउभारणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेले काहीजण पुन्हा परतीच्या मार्गावर आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के देत आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांनी मोठी खेळी करत शिंदे गटाचा बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लावला आहे.

शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. उद्या ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहे. त्यांच्या प्रवेशाने शहापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

पांडुरंग बरोरा यांचे वडील महादू बरोरा हे ४ वेळा शहापूर विधानसभेवर निवडून आले होते. शहापूर तालुक्यात त्यांनी विकास कामे केली. त्यामुळे शहापूर परिसरात त्यांचा दबदबा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या म्हणजेच गुरुवारी सायंकाळी ५ वाजता पांडुरंग बरोरा हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेणार आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. २०१९ मध्ये पांडुरंग बरोबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला होता.

मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर ते शिंदे गटात सामील झाले. गेल्या काही दिवसांपासून बरोरा हे शिंदे गटात नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. पण आता ते लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, शहापूरमध्ये सध्या दौलत दरोडा आमदार हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, त्यांनी अजित पवार गटाला आपलं समर्थन दिलं आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार आता पांडुरंग बरोरा यांना मैदानात उतरवणार आहे. लवकरच शरद पवार हे शहापूरमध्ये सभा देखील घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिंदे गटासह अजित पवार यांचं टेन्शन वाढणार आहे.