वाळव्यात बिबट्याचा धुडगूस!

रेठरे धरण (ता. वाळवा) येथील गावंधरमळा परिसरातील १०- १५ घरांच्या, माळी वस्तीवर बिबट्याने धुडगूस घातला. रात्रीच्या वेळी अंधारात तो आपले भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडत असल्याने त्याचा थेट नागरिकांशी सामना होत आहे. त्यामुळे तेथील नागरिक व महिला वर्गामध्ये घबराटीचे वातावरण आहे.

रोजच बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. मागील आठवड्यामध्ये या बिबट्याने दोन ते तीन वेळा कुत्र्यांवर हल्ला केला होता, आतापर्यंत त्याने दहा- बारा कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. माळी वस्तीवरील लोकांना बिबट्यापासून संरक्षणासाठी रात्रभर गस्त घालावी लागत आहे. रेठरे धरण गावाच्या उत्तर बाजूला पवार व माळी परिवारातील ग्रामस्थांची घरे असून, माळी वस्ती एका बाजूला आहे त्याठिकाणी रस्त्यावर अंधार असल्याने रात्री बिबट्या कुत्र्याचा माग काढत येतो, त्याठिकाणी दररोजच बिबट्याचे कुत्र्यांवर हल्ले वाढले आहेत.

वनपाल अनिल बर्गे म्हणाले, रेठरे धरण येथील नागरिकांना बिबट्याचा कोणताही त्रास होणार नाही, यासाठी वनकर्मचारी त्याठिकाणी पाठवून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.