वाळवा कोटभाग येथे सरकार वाडा मार्गावर काही मोकाट कुत्री आहेत. हुतात्मा चौक येथे तर श्वानांचा अड्डाच झाला आहे. इस्लामपूर तासगाव मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी हे दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर जातात. त्यास वाचवण्यासाठी वाहन गतीने चालवून अपघात घडत आहेत. जिकडे तिकडे चायनीज सेंटर आहेत इथे तर हमखास पाहायला मिळते. यातील काही पाळीव आहेत. परंतु ती मोकाट सोडून दिली आहेत. त्यांनी अनेकांचा चावा घेतला आहे. येथील होरे मगदूम पाटील गल्लीत काही नागरिकांनी श्वान पाळले आहेत.
तसेच सरकार वाडा मार्गावर अनेकांनी श्वान पाळले आहेत. यामध्ये होरे गल्लीपासून वीरेंद्र किणीकर यांच्या घरापर्यंत एका पाळीव परंतु मोकाट सोडलेल्या श्वानाने कित्येकांचा हळूहळू येऊन चावा घेतला आहे. हे श्वान रस्त्याने जाताना किंवा येताना त्यांच्या घरातील बोळांतून बाहेर आले की न भुंकता पाठीमागून पिंडऱ्यांचे लचके तोडून जखमी करत आहे. या भीतीने येथून मुले जात नाहीत. पालकांना त्यांना शाळेत अथवा इतर ठिकाणी सोडून यावे लागते. महिला पुढे बघून निघाल्या की हे कुत्रे हमखास चावा घेत आहेत. तीच अवस्था पुरुषांची आहे. तेव्हा याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.