वस्त्रनगरीतील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : सत्यजित पाटील

मतदारसंघातील इचलकरंजी हे सर्वात मोठे शहर आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुतांश उमेदवारांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये सरुडकर यांनी घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाल्यानंतर प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी काल दिवसभर समाजातील विविध घटकांशी संवाद साधला.

वस्त्रनगरीतील प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्यासाठी या निवडणुकीत मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी इचलकरंजीतील सेना भवनमध्ये नाभिक समाज बांधव, मॉडर्न हायस्कूलजवळील शिव मंदिरात लिंगायत समाज बांधव, चौंडेश्‍वरी मंदिरात देवांग समाज बांधव, मराठा मंडळ, मराठा महासंघ, कृष्णानगरमध्ये रिक्षा युनियन आणि शहरातील ख्रिस्ती, गोंधळी समाज बांधवांच्याही विविध ठिकाणी भेटी घेतल्या.

यावेळी सरुडकर यांनी एकवेळ संधी दिल्यास नक्कीच इचलकरंजीच्या पाणी, उद्योग- व्यवसायासह प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यावेळी शशांक बावचकर, मदन कारंडे, संजय कांबळे, राहुल खंजिरे, सयाजी चव्हाण, अब्राहम आवळे, अमरजित जाधव, सदा मलाबादे, प्रमोद खुडे, अजित मिणेकर, अभिजित रवंदे आदी उपस्थित होते.