पलूस तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विवाह खानापूर तालुक्यातील १९ वर्षीय मुलाशी नियोजित होता. या बालविवाहाची माहिती माहिती १०१८ या टोल फ्री क्रमांकावरून बाल संरक्षण कक्षास प्राप्त झाली. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या निर्देशानुसार चाईल्ड लाईनच्या प्रियंका माने, मिनाज शेख, इम्पियाज हकीम, विशाल पाटोळे यांचे पथक रवाना झाले. कारवाई दरम्यान धक्काबुक्की झाल्याने चाईल्ड लाईन टीमने विटा पोलिसांची आधिक कुमक घेतली. पोलिसांनी त्यांना सहकार्य केले. चाईल्ड लाईन टीम व पोलिस विवाहस्थळी पोहोचले.
यावेळी लग्नापूर्वीच्या विधीची तयारी सुरू होती. पथकाने मुलगी अल्पवयीन असल्याने विवाह करता येणार नाही, असे नातेवाईकांना स्पष्ट केले. नियोजित वधू-वरासह पालकांना विटा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तिथे त्यांना कायद्याची माहिती देण्यात आली. वधु-वरांना बोहल्यावर चढण्यापुर्वीच हा विवाह रोखण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यात सलद दुसऱ्या दिवशी हा बालविवाहाचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.