उन्हाची तीव्रता खूपच वाढलेली आहे. अनेक भागात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच शेती पिके हि पाण्याअभावी करपून देखील गेलेली आहेत.शिवपुरी गावात भीषण पाणीटंचाई आहे. तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी मिळावे यासाठी गावाने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. शनिवारी वाकुर्डे योजनेचे पाणी बंदिस्त जलवाहिनीतून शिवपुरी येथे सोडले होते. शिवपुरी येथे पाणी पोहोचण्याआधीच बंदिस्त जलवाहिनी वाघवाडी हद्दीत फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.
गावाला पिण्याचे पाणी नाही. पाठपुरावा करून वाकुर्डेचे पाणी गावाकडे आणताना जाणूनबुजून जलवाहिनी फोडली जात आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी शिवपुरी गाव रस्त्यावर उतरले होते. शिवपुरीकडे जाणारी वाकुर्डे योजनेची जलवाहिनी वाघवाडी (ता. वाळवा) हद्दीत फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी तिघा संशयितांवर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मयूर अर्जुन पाटील, माणिक संपत सूर्यवंशी, धनंजय परदेशी (तिघे रा. इस्लामपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी वारणा डावा कालव्याचे कर्मचारी राजेंद्र चौगुले यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.